जेईईचा खासगी क्लास अचानक बंद; ४५ लाखांची फसवणूक   

पुणे : जेईई मार्गदर्शनासाठी सुरू केलेला खासगी क्लास अचानक बंद करुन ३१ विद्यार्थ्यांकडून ४५ लाख रुपये घेऊन ते परत न करता फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, स्वारगेट पोलिसांनी एका संस्थाचालकासह चौघांवर गुन्हा दाखल केला.
 
बरकत कादरी (वय ४८, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, ‘फिटजी’ या खासगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक दिनेशकुमार गोयल, राजीव बब्बर, राजेशकुमार कर्ण (वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. स्वारगेट येथील वेगा सेंटरमधील फिटजी सेंटरमध्ये २१ जून २०२४ ते २ जुलै २०२४ दरम्यान हा प्रकार घडला होता.
 
आरोपींनी स्वारगेट जवळील वेगा सेंटर या इमारतीच्य तिसर्‍या मजल्यावर ‘जेईई’ क्लास सुरू केले होते. त्यांनी विद्यार्थ्यांकडून पैसे ऑनलाइन व रोख स्वरूपात घेतले होते. कादरी यांनी त्यांच्या मुलाचे अकरावी आणि बारावीसाठी जेईई परिक्षेच्या तयारीसाठी फिटजी संस्थेत २८ हजार ८०० रुपये भरुन प्रवेश घेतला होता. त्यानंतर ७५ हजार ३०० रुपये भरले होते.
 
जेईईसाठी ३० विद्यार्थ्यांनी पैसे भरले होते. मात्र, अचानक राजेशकुमार कर्ण याने पालकांची ‘ऑनलाइन मीटिंग’ घेतली. क्लास बंद केला असल्याचे सांगितले. 
पालकांनी शुल्काबाबत वारंवार मेलद्वारे विचारणा केली, तसेच शुल्क परत देण्याची मागणी केली. परंतु, आरोपींनी शुल्क परत न देता एकूण ३१ पालकांची ४५ लाख २३ हजार रुपयांना फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक जाधव याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. 

Related Articles